Thursday 5 October 2017

अश्विन पौर्णिमा अर्थात वर्षावास समाप्ती दिवस.

जगाच्या इतिहासात अश्विन पौर्णिमेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते. खरेतर या दिवसाचे महत्त्व आषाढ पौर्णिमा या दिवसापासून सुरु होते.


.
आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धाने सारनाथ येथे पाच परिव्राजक भिक्कुंना सर्वप्रथम ज्ञानदान केले. जगभर पसरलेल्या बुद्ध तत्वज्ञानाची सुरुवात याप्रकारे झाली. या प्रकारे बुद्ध हे जगद्गुरू झाले. म्हणून हा दिवस जगभर बुद्ध-गुरु-पौर्णिमा अर्थात गुरु-पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येतो. यानंतर सुमारे ८०० वर्षांनी या दिवसाचे रुपांतर व्यास-पौर्णिमा असे करण्यात आले. त्या ज्ञानदानालाच धम्मचक्र प्रवर्तन असेही म्हणतात. त्या वेळी ६० जणांचा पहिला भिक्कूसंघ निर्माण झाला होता.
.
मानवाचे दुःख नाहीसे व्हावे, समता-मानवता अशा मूल्यांची प्रस्थापना व्हावी, आत्मा-परमात्मा अशा अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी तथागत बुद्धाचा उपदेश, बुद्धाचे ज्ञान याचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बौद्ध भिक्कू सर्व दिशांनी पायी फिरत असत. पावसाळ्यात मात्र त्यांना या कार्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. त्या काळी जंगल, नद्या नाले, कच्चे रस्ते, पायवाटा, दगड-गोटे, चिखल, पाऊस, वादळ-वारा यांच्या त्रास सहन करत ज्ञानदानाचे कार्य करीत फिरणे अत्यंत कठीण होते. अनेक जण आजारी पडत, कोणी मृत्युमुखीही पडत. त्यामुळे तथागत बुद्धांनी वर्षावास ही संकल्पना रूढ केली.
.
वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास. हा वर्षावास आषाढ पौर्णिमेपासून सुरु होतो व अश्विन पौर्णिमेस संपतो. या कालावधीत भिक्कूंनी विहारात एकत्र राहावे, ज्ञानग्रहण करावे, चर्चा व संवाद करावा अशा सूचना बुद्धाने दिल्या. या काळात उपासक मंडळी विहारात भिक्कुंना भोजनदान करण्यासाठी जात. त्या निमित्ताने ज्ञान-ग्रहण सुद्धा करीत.
.
अश्विन पौर्णिमेस या भिक्कुंचा वर्षावास समाप्त होत असतो. तथागतांची शिकवणूक – “चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय। म्हणजेच:- जा भिक्षुंनो, चारी दिशांना जा. चारिका करा आणि बहुजन हिताचा बहुजन सुखाचा धम्म लोकांना द्या.” याप्रमाणे भ्रमंती करण्यास भिक्कू संघ पुन्हा नव्या उमेदीने सज्ज झाला असतो. प्रकारे तथागताने दिलेल्या आदेशाप्रमाणे दर वर्षी या पौर्णिमेला भिक्खू चारही दिशांनी धम्म प्रचाराला व मानव जातीच्या कल्याणाला निघतात. या दिवशी भिक्कुंना नवीन वस्त्र अर्थात चीवर, आवश्यक वस्तू व भोजनदन केले जाते. तसेच सर्वांना खीरदान सुद्धा केले जाते.
.
बौद्धकाळात हा अश्विनी पौर्णिमेचा वर्षावास समाप्तीचा उत्सव कशा प्रकारे साजरा होत असे, त्याचे वर्णन उन्मादयंती जातकावरून कळते. दशावतार कल्पनेचा जन्म झाल्यावर तयार झालेल्या वामन पुराणाने याला दीपदानजागर म्हटले आहे. गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान झालेल्या वात्सायनाने या दिवसाला कौमुदीजागर असे म्हटले आहे. त्यानंतर हा दिवस कोजागिरी (कोजागरी) पौर्णिमा म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. या दिवशी लक्ष्मी नावाची देवी घुबड या पक्ष्याच्या वाहनावरून येते व “को जाग्रति” अर्थात कोण जागे आहे असे बघते व जागे असणाऱ्यांवर ती कृपा करते अशी कल्पना करण्यात आली. आश्चर्य म्हणजे कोजागिरीलासुद्धा खीरदान केले जाते.
.
आश्विन शुक्ल दशमीला सम्राट अशोक यांनी धम्मदीक्षा घेतली होती. तेव्हापासून तो दिवस अशोक-विजया-दशमी म्हणून साजरा करण्यात येत असतो. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १९५६ साली धम्मदीक्षा घेतली. तसेच त्यांनी त्याच दिवशी सुमारे ८ लाख अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. यासाठी त्यांनी २२ प्रतिज्ञा मुद्दाम तयार करून वदवून घेतल्या होत्या. याप्रकारे त्यांनी जनसामान्यांना धम्म-दीक्षा देण्याचा विधी सुरु केला. या प्राचीन व अर्वाचीन धम्मक्रांतीनंतर पाच दिवसांनी अश्विन पौर्णिमा येते. हेही या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व होय.
.
या दिवशी वर्षावास समाप्तीनिमित्त विहारांमध्ये प्रवचन, ज्ञानदान यांचे कार्यक्रम ठेवले जातात. घरोघरी उपोसथ व्रत, अष्टशीलाचे पालन, मित्र व स्वकीयांना खीरदान केले जाते. या दिवशी बुद्धाच्या शिकवणुकीच्या प्रसार व प्रचाराचे नवे वार्षिक पर्व सुरु होते.
-धनंजय आदित्य #adinama